जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सुप्त कलागुणांना आणि क्रीडावृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (१० मार्च) सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे विविध स्पर्धांचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जळगाव शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सीमा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटन सत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा मंगला नगरकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अंजली पाटील यांनी केले, तर देवानंदा साखला यांनी सूत्रसंचालन केले.
विविध विषयांवरील स्पर्धांनी वेधले लक्ष..
यावेळी वकृत्व, भारुड गायन, लघुनाटिका आणि रिल्स अशा चार प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वकृत्व स्पर्धेसाठी ‘स्त्रीवादी राजकारण’, ‘महिलांचा राजकीय प्रवास’ आणि ‘एआय: शाप की वरदान’ असे समकालीन विषय देण्यात आले होते. लघुनाटिकेत ‘सती ते प्रगती’, ‘मी नागरिक मी बाई’ आणि ‘सरपंच बाई’ या विषयांतून स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडण्यात आले. भारुड गायन स्पर्धेतून ‘महिला आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ यावर प्रबोधन करण्यात आले, तर रिल्स स्पर्धेसाठी ‘आपला अभिमान: भारतीय संविधान’ हा विषय ठेवण्यात आला होता.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:
वकृत्व स्पर्धा: प्रथम-अंकिता गाजरे, द्वितीय- रागिणी सोनवणे, तृतीय- मानसी शिंदे.
भारुड गायन: प्रथम- भैरवी ग्रुप, द्वितीय- मेघ क्षत्रिय महिला मंडळ, तृतीय- एस.एस. मणियार लॉ कॉलेज.
लघुनाटिका: प्रथम- वनिता विश्व महिला मंडळ, द्वितीय- जी.डी. बेंडाळे महाविद्यालय, तृतीय- के.सी.ई. महाविद्यालय.
रिल्स स्पर्धा: प्रथम- शितल ठाकूर, द्वितीय- प्रेरणा चौधरी, तृतीय- पूजा आंबेकर व वनिता विश्व महिला मंडळ.
परीक्षक व पारितोषिक वितरण..
स्पर्धेचे परीक्षण प्रांजली रस्से, विशाखा देशमुख, हनुमान सुरवसे, चिंतामण पाटील, दीप्ती बारी आणि अजय पाटील यांनी केले. विजेत्यांना शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन राजकमल पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा मंगला नगरकर, सचिव कमल पाटील, प्रकल्प प्रमुख अंजली पाटील, उपाध्यक्ष देवानंदा सांखला, छाया गडे, पुष्पा साळवे, चंद्रकला परदेशी, राजकमल पाटील, भारती पाथरकर, ज्योत्स्ना बऱ्हाटे, हेमा रोकडे, श्रद्धा रेखा राजेंद्र, निखिल पाटील, सुश्मिता भालेराव आदींनी परिश्रम घेतले.







