जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शारदा कॉलनी परिसरातील टोके शाळेत लिनेस क्लब जळगाव तर्फे नुकतेच भव्य दंत चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
या शिबिरात प्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ. ऋषिकेश वराडे व डॉ. उमा वराडे यांनी मुलांच्या दातांची सखोल तपासणी केली. मुलांच्या दातांच्या तक्रारी जाणून घेत, ज्या मुलांना दातांच्या समस्या होत्या त्यांना तात्काळ औषधींचे वाटप करण्यात आले. तसेच दात निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी मुलांना प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रभाग १३ च्या नगरसेविका सुरेखा तायडे, दिपाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते उपस्थित सर्व मुलांना टूथपेस्ट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी लिनेस क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
लिनेस क्लबच्या अध्यक्षा रेखा वर्मा यांनी मुलांशी संवाद साधत आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. “लहानपणापासूनच दातांची निगा राखल्यास भविष्यातील मोठे आजार टाळता येतात,” असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका भावना पाटील यांनी शिबिराची पार्श्वभूमी स्पष्ट करत पाहुण्यांचे स्वागत केले. लिनेस क्लबच्या सेक्रेटरी नीला चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिनेस क्लबचे सदस्य आणि शाळेतील शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.







