जळगाव, (प्रतिनिधी) : “जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा धर्मरक्षणासाठी महापुरुषांचे अवतार होतात. आजच्या काळात धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्याची स्थापना करण्यासाठी हिंदूंचे संघटन होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी केले. १ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील मानराज पार्क, श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता आयोजित ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’च्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, सकल हिंदु समाजाचे राकेश लोहार आणि समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट उपस्थित होते.
सभेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आकर्षणे:
’वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभेत उपस्थित १० हजारहून अधिक धर्मप्रेमी नागरिक एकत्रितपणे या गीताचे गायन करणार आहेत. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे ‘शिवकालीन शस्त्र प्रदर्शन’ १ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपासून ते २ फेब्रुवारी दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. प्रबोधनपर प्रदर्शन: सनातन संस्थेतर्फे राष्ट्र, धर्म, अध्यात्म आणि आयुर्वेद या विषयांवरील ग्रंथ व फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
यासभेत ३० वर्षे देशसेवा केलेले लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडये, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बीरेंद्र इचलकरंजीकर आणि प्रशांत जुवेकर सभेला संबोधित करतील.
“हिंदु धर्माचे आचरण आणि प्रभावी संघटन हीच काळाची गरज आहे. जळगावमधील जास्तीत जास्त हिंदूंनी या सभेला उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी व्हावे.”
— प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज
जळगावमधील सर्व शिवप्रेमी, धर्मप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या सभेचा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.







