जळगाव, (प्रतिनिधी) : भरारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बहिणाबाई महोत्सवा’चा आज समारोपाचा दिवस. मात्र, सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे या महोत्सवात काहीसा विरजण पडले. पावसाच्या हजेरीमुळे जळगावकरांचा चांगलाच हिरमोड झाला असला, तरी खवय्यांनी मात्र खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर तुफान गर्दी करत महोत्सवाचा आनंद कायम ठेवला.
सांस्कृतिक कार्यक्रमांना पावसाचा फटका..
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसाचे आगमन झाल्याने आयोजकांना हे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागले. यामुळे कलाकारांना पाहण्यासाठी आलेल्या रसिकांची निराशा झाली.
स्टॉलधारकांची धावपळ..
पाऊस सुरू होताच प्रदर्शनातील इतर स्टॉलधारकांची मोठी धावपळ उडाली. आपले साहित्य भिजू नये यासाठी व्यावसायिकांनी तातडीने साहित्याची आवराआवर करून ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.
खवय्यांचा उत्साह कायम..
एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे रद्द झालेले कार्यक्रम अशा परिस्थितीतही जळगावकरांचा उत्साह कमी झाला नाही. महोत्सवातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘खाऊ गल्ली’त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बचत गटांच्या वतीने लावण्यात आलेले खाद्यपदार्थांचे साधारण १०० स्टॉल्स सुरू होते. पाऊस पडत असतानाही नागरिकांनी विविध चविष्ट पदार्थांवर ताव मारत पावसाळी वातावरणाचा आनंद घेतला. पावसाने रंगाचा बेरंग केला असला, तरी जळगावकरांनी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेत बहिणाबाई महोत्सवाचा निरोप घेतला.







