जळगाव, (प्रतिनिधी) : येथील खान्देशाची संस्कृती जपणाऱ्या ‘बहिणाबाई महोत्सवात’ राजकीय प्रोटोकॉल बाजूला सारून माणुसकीचे आणि साधेपणाचे एक आगळेवेगळे दर्शन घडले. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी व्हीआयपी आसन व्यवस्था उपलब्ध असतानाही, सामान्य महिला आणि बालकांसाठी आपली खुर्ची सोडून चक्क जमिनीवर मांडी ठोकली आणि कीर्तनाचा आनंद लुटला. त्यांच्या या कृतीने उपस्थित जळगावकरांची मने जिंकली.
बहिणाबाई महोत्सवाच्या सायंकाळच्या सत्रात आमदार राजूमामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा पार पडल्यानंतर दोंडाईचा येथील ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन सुरू होणार होते. दरम्यानच्या काळात आमदार भोळे यांनी महोत्सवातील बचत गटांच्या प्रदर्शनाला व खाऊ गल्लीला भेट देऊन महिला उद्योजकांचा उत्साह वाढवला.
आयोजकांची विनंती नाकारली..
भेट देऊन आमदार पुन्हा मुख्य व्यासपीठासमोरील व्हीआयपी कक्षात परतले. मात्र, त्याठिकाणी आधीच काही सामान्य महिला नागरिक आणि लहान मुले बसलेली होती. आपल्या लाडक्या आमदारांना जागा करून देण्यासाठी आयोजकांनी संबंधित महिलांना मागे बसण्याची विनंती केली. ही बाब राजूमामांच्या लक्षात येताच त्यांनी कोणालाही उठवण्यास सक्त मनाई केली. कोणताही बडेजाव न मिरवता त्यांनी लागलीच जमिनीवर मांडी घालून बसणे पसंत केले.
व्हीआयपी कक्षात बसलेल्या महिला भगिनींनी आमदार भोळे यांना विनंती केली की, “मामा, तुम्ही सोफ्यावर बसा.” मात्र, आपल्या पदाचा कोणताही अहंकार न बाळगता त्यांनी जमिनीवर बसूनच कीर्तन ऐकण्याचा आनंद घेतला. आमदारांचा हा साधेपणा पाहून दीपक सूर्यवंशी, आयोजक दीपक परदेशी, पवन जैन यांनी देखील त्यांच्या शेजारी जमिनीवर बसून कीर्तनाचा लाभ घेतला.
लोकप्रतिनिधीने सामान्य जनतेशी नाळ कशी जोडून ठेवावी, याचा आदर्शच जणू या निमित्ताने पाहायला मिळाला. महोत्सवाला उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या या विनयशील स्वभाव चर्चेचा विषय ठरला आहे.







