जळगाव, (प्रतिनिधी) : खान्देशच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या ‘बहिणाबाई महोत्सवा’चे ११ वे पर्व सध्या जळगावात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. शनिवारी या महोत्सवात कला, फॅशन आणि खान्देशी खाद्यसंस्कृतीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. जळगावकरांच्या अलोट गर्दीने आणि प्रतिसादाने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘बहिणाबाई पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे तोंडभरून कौतुक केले. “स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज असून, असे महोत्सव संस्कृती जपण्याचे काम करतात,” असे प्रतिपादन करणवाल यांनी यावेळी केले.
फॅशन शोने वेधले लक्ष..
महोत्सवातील सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे ‘फॅशन शो’. यात आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख संगम पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेसह विविध नवनवीन फॅशन प्रकारांनी जळगावकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आत्मविश्वासपूर्ण चाल आणि आकर्षक पेहरावातील मॉडेल्सना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
खाऊ गल्लीत खवय्यांची मांदियाळी..
महोत्सवाचा आत्मा असलेल्या खान्देशी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केली होती. महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अस्सल खान्देशी पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांच्या उड्या पडल्या. झणझणीत भरीत-भाकरीपासून ते विविध घरगुती पदार्थांच्या सुगंधाने संपूर्ण परिसर दरवळला होता.








