जळगाव, (प्रतिनिधी) : तेली प्रदेश महिला मंडळ जळगाव आणि शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीनिमित्त तेली समाजातील महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पांझरापोळ टाकीजवळील शाळा नंबर ३ मध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला जळगाव शहरातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मैत्री आणि समाजवाढीचा संकल्प..
नेहमीच्या घरगुती आणि कामकाजाच्या व्यापातून महिलांना थोडा विरंगुळा मिळावा आणि समाजातील सर्व भगिनींनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी, या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच त्यांच्यासाठी मजेशीर खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती आणि नियोजन..
हा कार्यक्रम तेली समाज महिला महानगराध्यक्ष मनीषा प्रदीप चौधरी, निर्मला चौधरी व बेबाबाई सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार झाला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुनंदा चौधरी, डॉ. सुषमा चौधरी आणि डॉ. सुजाता प्रदीप चौधरी यांनी केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना विविध प्रकारची बक्षिसे आणि संक्रांतीचे पारंपारिक ‘वाण’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रिया चौधरी, आशा चौधरी, मेघा चौधरी, सारिका चौधरी, प्रतिभा चौधरी, अनिता चौधरी, कविता चौधरी, लताबाई चौधरी आणि उषा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रशांत सुरडकर, प्रमोद चौधरी, विनोद चौधरी व उमेश चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








