जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरात एका ३८ वर्षीय महिलेच्या घराच्या सिमेंटच्या पत्र्याला छिद्र पाडून, मोबाईलवर माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी भागात एक ३८ वर्षीय महिला आपल्या अल्पवयीन मुलीसह वास्तव्यास आहे. संशयित आरोपी पुरुषोत्तम निवृत्ती कुटे (रा. केशव नगर, ता. रिसोड, जि. वाशिम) याने या माय-लेकी राहत असलेल्या घराच्या सिमेंटच्या पत्र्याला होल (छिद्र) पाडले. या छिद्रावाटे त्याने महिलेचे आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले. व्हिडिओ काढल्यानंतर त्याने दोघींचा विनयभंग केल्याचीही माहिती समोर आली आहे.
पोलिसांची कारवाई..
हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुरुवारी, २२ जानेवारी रोजी सायंकाळी आरोपी पुरुषोत्तम कुटे याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत. आरोपीने हे व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केले आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.








