जळगाव, (प्रतिनिधी) : मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्यासाठी जळगाव येथील काव्य रत्नावली चौक येथे ‘बंधुतेचे तिळगूळ’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “तिळगुळ घ्या, बंधुतेने वागा” असा संदेश देत सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र आणून हा सण साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानातील विविध मूल्यांचा, विशेषतः ‘बंधुता’ या मूल्याचा प्रचार आणि प्रसार करण्यावर भर दिला. केवळ सण म्हणून नव्हे, तर एकमेकांबद्दल आदर आणि समतेची भावना ठेवून आपण सर्वांनी जीवन जगले पाहिजे, असा मोलाचा संदेश या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये सुष्मिता भालेराव, निखिल रांजणकर, श्रद्धा राजेंद्र, अजय पाटील, मीनाक्षी चौधरी, महेश शिंपी, पल्लवी शिंपी, इरफान पिंजारी, रमेश भोळे, सागर साळुंके, प्रसेनजीत लभाणे, किरण नाईक, शोभा बोऱ्हाडे, प्रल्हाद बोऱ्हाडे, प्रा. दिगंबर कट्यारे, अमोल कोल्हे यांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्वधर्मीय मित्रांना आणि उपस्थित नागरिकांना तिळगुळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. “सर्व भारतीय सण एकत्र येऊन साजरे करूया आणि समाजात समतेचा विचार रुजवूया,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








