जळगाव, (प्रतिनिधी) : ‘राज्याची लोकवाहिनी’ म्हणून ओळखली जाणारी एसटी सध्या स्वतःचा कायापालट करत असल्याचे दावे महामंडळाकडून केले जात आहेत. मात्र, जमिनीवरची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. जळगाव बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांचा आपापसातील समन्वयाचा अभाव आणि बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला.
आज रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ६:५५ वाजता एका प्रवाशाने चौकशी खिडकीवर ‘जळगाव ते बऱ्हाणपूर’ बसबाबत विचारणा केली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने “बऱ्हाणपूर गाडी आता नाही, थोड्यावेळाने रावेर गाडीने जा” असे सांगून प्रवाशाला वाटेला लावले. मात्र, प्रत्यक्षात त्याच वेळी स्थानकात (एम.एच.१४ बी.टी.३९७४) क्रमांकाची बस बऱ्हाणपूर-रावेर फलाटावर उभी होती. प्रवाशाने स्वतः खात्री केली असता, त्या गाडीवरील महिला वाहकाने सदर बस बऱ्हाणपूरलाच जात असल्याचे सांगितले. जर प्रवाशाने स्वतः शहानिशा केली नसती, तर त्याला विनाकारण रावेरला उतरून पुढची वाट पाहावी लागली असती.
ना पाटी, ना स्पष्टता!..
आश्चर्याची बाब म्हणजे, या बसवर गावाच्या नावाची अधिकृत पाटी देखील नव्हती. काचेवर चून्याने अस्पष्ट अक्षरात नाव लिहिले होते, जे दुरून ओळखणे अशक्य होते. डिजिटल इंडियाच्या काळात ‘चून्याने’ नाव लिहिण्याची वेळ एसटीवर आली आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
सुट्या पैशांचा ‘रारंभा’ कायम..
केवळ माहितीचाच गोंधळ नाही, तर बसमधील वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणारे वाद नित्याचे झाले आहेत. अनेकदा वाहक उरलेले पैसे परत करत नाहीत किंवा त्यावरून उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी वाढल्या आहेत.
प्रवाशांचा सवाल: जबाबदार कोण?
चौकशी केंद्र, चालक आणि वाहक यांच्यात ताळमेळ नसल्याने प्रवाशांना स्थानकात एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर धावाधाव करावी लागते. महामंडळ ‘कात’ टाकत असल्याच्या गप्पा मारत असताना, मूलभूत सुविधा आणि अचूक माहिती देण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. या भोंगळ कारभारावर वरिष्ठ अधिकारी लगाम लावणार की प्रवाशांना असाच रामभरोसे प्रवास करावा लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.







