जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
नियोजनाबद्ध प्रचार रॅली रॅलीचा प्रारंभ सकाळी ८ वाजता हॉटेल इंपिरिया येथून उत्साहात झाला. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. विश्वनाथ खडके (१६ अ), वंदना संतोष इंगळे (१६ ब), रंजना विजय वानखेडे (१६ क) आणि सुनील वामनराव खडके (१६ ड) यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. काशिनाथ लॉजपासून सुरू झालेली ही रॅली गुरुकुल, अपनाघर कॉलनी, दिलीप काका यांचे निवासस्थान, रेमंड कॉलनी, संतोषभाऊ इंगळे यांचे निवासस्थान, धनुशकु मेडिकल परिसर आणि एम.एस.ई.बी. कार्यालय या मार्गाने मार्गस्थ झाली.
विकासाचे व्हिजन आणि विश्वास.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले. “प्रभागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि मूलभूत सुविधांना आमचे प्राधान्य असेल,” असा शब्द उमेदवारांनी दिला. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसरातील वातावरण ढवळून निघाले होते.
आरती आणि विजयाचा संकल्प
या रॅलीचे नेटके नियोजन भाजप मंडळ ४ चे सरचिटणीस किसन भगवान मराठे यांनी केले होते. रॅलीचा समारोप अपनाघर येथील हनुमान मंदिरात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि उमेदवारांनी सामूहिक आरती केली आणि विजयाचा संकल्प सोडून रॅलीची सांगता केली. या रॅलीत भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








