जळगाव, (प्रतिनिधी) : नूतन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना, जळगावचे वृत्तपत्र आणि डिजिटल मिडिया ‘खान्देश प्रभात’ च्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) प्रकाशन शुक्रवारी दि. ३ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
या छोटेखानी परंतु गरिमामय सोहळ्याप्रसंगी ‘खान्देश प्रभात’चे संपादक हेमंत पाटील (जळगावकर) प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच ‘केसरीराज’चे संपादक भगवान सोनार, मिडिया विभागाचे अनिल जोशी, विश्वजित चौधरी, दीपक जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अशोकभाऊ जैन यांनी ‘खान्देश प्रभात’च्या वाटचालीचे कौतुक केले आणि ही दिनदर्शिका वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. खान्देशातील संस्कृती, सण-उत्सव आणि माहितीचा खजिना या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणार आहे.
संपादक हेमंत पाटील यांनी यावेळी सर्व जाहिरातदार, वाचक आणि हितचिंतक यांचे मनस्वी आभार मानले. त्यांच्या अखंड सहकार्यामुळेच ‘खान्देश प्रभात’ प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचे जळगाव शहर व जिल्ह्यातील वाचकवर्गातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.








