जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. भाजपच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुंवर यांनी बुधवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
बुधवारी ३१ डिसेंबर रोजी महानगरपालिकेत उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पार पडली. प्रभाग १२ ‘ब’ मध्ये भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधात वैशाली निवृत्ती पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले होते. मात्र, एकाच प्रभागात तीन अर्ज भरता येत नसल्याचे आणि तांत्रिक मुद्द्यांवर त्यांचे ‘ब’ व ‘ड’ मधील अर्ज बाद ठरवण्यात आले. तसेच, भाजपने वैशाली पाटील यांना ‘एबी’ फॉर्म देखील दिलेला नव्हता. त्यामुळे या जागेवर बेंडाळे या एकमेव उमेदवार उरल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये महायुती मधून भारतीय जनता पक्षाला चारही जागा मिळालेले आहेत. यात १२ अ मधून अनिल अडकमोल, १२ ब मध्ये उज्वला मोहन बेंडाळे, १२ क मधून गायत्री इंद्रजीत राणे, १२ ड मध्ये नितीन मनोहर बरडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. वैशाली निवृत्ती पाटील यांचा १२ क मध्ये अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून भाजपच्या गायत्री राणे यांच्या विरोधात लढतील.
दरम्यान उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.








