जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. केवळ राजीनामा देऊनच ते थांबले नाहीत, तर “पक्षाची विक्री झाली आहे” असा खळबळजनक आरोप करत त्यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागा वाटपाचा तिढा सुरू आहे. जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच आणि अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे लिहिलेले त्यांचे दोन ओळींचे राजीनामा पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गंभीर आरोप आणि संताप..
राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिषेक पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावनांची किंमत राहिलेली नाही आणि पक्षाची विक्री झाली आहे. या एका वाक्याने महायुतीमधील अंतर्गत कलह आणि जागा वाटपावरून असलेला असंतोष चव्हाट्यावर आणला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना या राजीनाम्यामागे असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर शहराध्यक्षांनीच साथ सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ऐन निवडणुकीत सेनापतीच मैदानातून बाहेर पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या राजीनाम्याचा परिणाम केवळ राष्ट्रवादीवरच नाही, तर महायुतीच्या एकत्रित कामगिरीवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अभिषेक पाटील आता कोणती भूमिका घेतात आणि या आरोपांवर पक्ष नेतृत्व काय उत्तर देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








