जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अंकिता पंकज पाटील यांनी मंगळवार, ३० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
मंगळवारी सकाळी ९ वाजता माजी नगरसेवक स्व.विनायक सोनवणे यांच्या निवासस्थानापासून अंकिता पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांचे आशीर्वाद घेऊन त्या महानगरपालिकेत पोहोचल्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि समर्थकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. माजी महापौर सीमाताई भोळे, पती पंकज पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
भारतीय जनता पक्षाने यंदा ‘तरुण तडफदार आणि नवीन’ चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. अंकिता पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना प्रभाग ७ ‘ब’ मधून रिंगणात उतरवले आहे.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार..
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, निवडणूक प्रमुख आ. राजूमामा भोळे, प्रभारी आ. मंगेश चव्हाण, खा. स्मिता वाघ, नितीन लढ्ढा आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि विकास कामांची गती वाढवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.” प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.








