जळगाव, (प्रतिनिधी) : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित यंत्रणांची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतींचे ४ जानेवारी रोजी सकाळी ६.०० वाजता रेल्वेमार्गे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर ते ‘अजिंठा’ शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. विश्रामगृहावरून सकाळी ८.०० वाजता ते पुढील कार्यक्रमासाठी अजिंठा (छत्रपती संभाजीनगर) कडे रवाना होणार आहेत.
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी रेल्वे स्थानक परिसर आणि शहरात चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे चोख नियोजन करावे. रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि अतिक्रमणे हटविण्याची मोहीम तात्काळ राबवावी. स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन करून जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. दौऱ्याच्या मार्गावरील नादुरुस्त रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना सूचना दिल्या आहेत.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपवनसंरक्षक राम धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, महावितरण, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.








