चोपडा, (प्रतिनिधी) : येथील चहार्डी विद्या प्रसारक मंडळ संचालित भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील विद्या मंदिर, चहार्डी येथे २२ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय गणित दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या १५६ गणितीय मॉडेल्सचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले.
कार्यक्रमाचे उद्घाटन चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यालयाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “३६५ विद्यार्थ्यांचा सहभाग आणि १५६ आगळीवेगळी गणितीय मॉडेल्स असलेले असे प्रदर्शन मी प्रथमच पाहत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती घालवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.”
रामानुजन यांना खरी आदरांजली – डॉ. सुरेश पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चहार्डी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश शामराव पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गणिताचे प्रात्यक्षिक मॉडेल तयार करणे हीच श्रीनिवास रामानुजन यांना खरी आदरांजली आहे. त्यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख नरेंद्र सुकलाल सोनवणे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पराग शिवाजीराव पाटील, सचिव ॲड. प्रकाश आनंदराव पाटील उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पंकज भागवत पाटील व पर्यवेक्षक प्रदीपकुमार सुखदेव अहिरे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला.
परीक्षण व पारितोषिक वितरण..
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे परीक्षण संजय हरी पाटील, अतुल शांताराम चव्हाण आणि भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील यांनी केले. दोन गटात झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही पारितोषिके कै. बाबासाहेब शिवाजीराव महारू पाटील बहुउद्देशीय विकास संस्था, चहार्डी आणि स्व. छबिलदास माधव पाटील (माजी मुख्याध्यापक) यांच्या स्मरणार्थ देण्यात आली.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गणित शिक्षक जगदीश दोधा सोनवणे, सचिन शिवाजीराव पाटील आणि सुधीर छबीलदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रदर्शनाची सांगता करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरात विद्यालयाचे कौतुक होत आहे.








