जळगाव, (प्रतिनिधी) : येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक कार्यास अधिक गती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दोन टीव्ही संच सप्रेम भेट दिले आहेत. या उपक्रमामुळे शाळेतील अध्यापन आता अधिक रंजक आणि प्रभावी होणार आहे.
डिजिटल शिक्षणाची संधी..
शाळेचे माजी विद्यार्थी उत्कर्षा सपके, उर्वशी सपके, लीना माळी, पायल सोनगिरे, तेजश्री माळी, ऋतिका कासार, पल्लवी महाजन, भावेश पालवे, लकी सपके, श्याम चव्हाण, सुमित दुसाने, कार्तिक इंगळे, लोकेश वाघ, भाग्यश्री मिस्त्री आणि ऋतुजा वाणी यांनी एकत्र येत हा कौतुकास्पद निर्णय घेतला. या भेट दिलेल्या टीव्ही संचांमुळे विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य (Audio-Visual) माध्यमांच्या सहाय्याने कठीण विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
ऋण व्यक्त करण्याची भावना..
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की, “अशा उपयुक्त भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागतो. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आदर्श मार्ग आहे.” शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे हे योगदान इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थित शिक्षक वृंदाने व्यक्त केली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








