अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. डॉ. बाविस्कर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा ८,६४८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत अमळनेरच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे.
या निवडणुकीत मुख्य लढत ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिवसेना शिंदे गट’ अशी थेट पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानात डॉ. बाविस्कर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली जी शेवटपर्यंत कायम राहिली. डॉ. बाविस्कर यांना एकूण ३०,८५६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला मतदारांनी नाकारल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले.
नगरपालिकेला ‘सलाईन’ लावून संजीवनी देणार – डॉ. बाविस्कर
विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी आपल्या विजयाचे श्रेय अमळनेरच्या जनतेला दिले. ते म्हणाले, “नगरपालिकेची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. मी शब्दाला जागणार असून, पालिकेच्या रडत असलेल्या गाड्याला ‘सलाईन’ लावून त्याला संजीवनी देण्याचे काम प्राधान्याने करेल. शहराचा कायापालट करणे हेच माझे आता एकमेव ध्येय असेल.”
डॉ. बाविस्कर यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी केली. या निकालामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून आगामी काळात अमळनेरच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.








