जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात” तातडीने समाविष्ट करावे, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत केली.
अमळनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा आणि जळगाव या तालुक्यांतील गावांमध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असूनही, त्यांना या योजनेपासून वंचित ठेवले गेले आहे. दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, रस्ते आणि रोजगाराच्या संधींची येथे तीव्र कमतरता आहे.
खासदार वाघ यांनी लक्ष वेधले की, या गावांना विकास योजनांपासून दीर्घकाळ दूर ठेवल्याने विषमता वाढत आहे. “जनजातीय समाजाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचा भविष्यकाळ धोक्यात घालणे आहे. या गावांना विकासाचा समान हक्क मिळालाच पाहिजे,” असे मत त्यांनी जोरदारपणे मांडले.
या समावेशामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा होईल आणि जळगाव जिल्ह्याच्या संतुलित विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.








