यावल, (प्रतिनिधी ) : यावल नगर परिषद निवडणुकीत आज सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांचा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः सकाळी सात वाजताच शहरात हजारो महिलांनी मतदान केंद्रांवर शांत, संयमी आणि अनुशासित पद्धतीने उपस्थिती लावत मतदानाच्या जनजागृतीत सक्रिय सहभाग नोंदवला.
महिला मतदारांच्या या भव्य उपस्थितीमुळे केवळ यावलचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यावल नगर परिषदेच्या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. महिलांच्या जागरूकतेचे आणि लोकशाहीप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठा व सामर्थ्याचे स्पष्टपणे दर्शन आज यावलमध्ये घडले आहे.
आचारसंहितेचे कठोर पालन..
मतदानाचा दिवस असूनही, प्रशासनाने आणि नागरिकांनी आचारसंहितेचे पूर्ण पालन राखले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली असून, कोणत्याही प्रकारचा प्रचार, घोषणाबाजी किंवा नियमभंग न करता सर्व उपक्रम शांततेत आणि जबाबदारीने पार पडले. यावलमधील नागरिकांनी लोकशाहीप्रती सजगता, शिस्त आणि सामंजस्याचे एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. प्रत्येक मतदाराने निर्भयपणे आणि शिस्तीत मतदान करून आपला हक्क बजावला आहे.

जागरूक नागरिकत्वाचा आदर्श..
यावलमध्ये आज लोकशाहीचा खरा उत्सव शांतता, नियमांचे पालन आणि जागरूक नागरिकभावनेच्या जोरावर साजरा होत आहे. मतदानासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि त्यातील नागरिकांचा उत्साह, विशेषत: महिलांचा सक्रिय सहभाग, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. यावलकर नागरिकांनी दाखवलेली ही शिस्त आणि लोकशाहीवरील विश्वास हा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.








