जळगाव, दि. 23 – स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ६, ७, ८, ९ जानेवारी २०२२ रोजी जळगावात करण्यात येत आहे. यंदाचे हे २० वे वर्ष असल्यामुळे या वर्षी प्रतिष्ठान एक दिवस वाढवून चार दिवसांचा हा महोत्सव करणार आहे.
या महोत्सवाच्या तारखा ठरल्या होत्या, मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत अनिश्चितता होती. दरम्यान प्रतिष्ठान च्या वतीने ठिकाण देखील निश्चित करण्यात आले असून शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचप्रमाणे उदयोन्मुख व आश्वासक अशा अनेक कलावंतांना सहभागी करून घेण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे महोत्सवातील प्रत्येक सत्र हे प्रेक्षणीय व श्रवणीय असणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ रोजी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भारतीय स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मुकेश कुमार सिंग, युनियन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर गिरिजा भूषण, मिश्रा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अंजली भावे तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन चे झोनल मॅनेजर अग्रवाल तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची वेळ संध्याकाळी ७ ते ११ असणार असून कोविड-१९ या महामारीच्या शासकीय नियमनांच्या अधीन राहून रसिकांना मास्क शिवाय प्रवेश नसून प्रवेशद्वारावर त्यांचे शारीरिक तापमान घेतले जाणार आहे व हात सॅनिटाइज केले जाणार आहेत त्यामुळे रसिकांनी ६.३० वाजता प्रवेश घेणे अपेक्षीत आहे.