अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत रंग भरण्यासाठी आता विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांना सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर आणि नगरसेवकपदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेनेने मोठी ताकद उभी केली आहे.
शिवसेनेचे संसदीय गटनेते तथा संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज, बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२:०० वाजता, म्हसकर प्लॉट, स्वामी नारायण मंदिर, स्टेशन रोड, अमळनेर येथे करण्यात आले आहे. अमळनेर शहरात डॉ. श्रीकांत शिंदे यांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे.
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शिवसेना पक्षाच्या सर्व स्टार प्रचारक नेत्यांना सभेसाठी आमंत्रित केले आहे. या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे यांचीही खास उपस्थिती असणार आहे. शिवसेनेने माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद उभी केल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास खात्याच्या माध्यमातून अमळनेर शहरास भरघोस निधी मिळेल आणि शहराचा विकासाचा अनुशेष भरून निघेल, अशी अपेक्षा नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या ऐतिहासिक सभेला शिवसेनेचे वरील सर्व प्रमुख नेत्यांसह जिल्ह्यातील आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. अमोल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, महिला आघाडी प्रमुख सरीता माळी-कोल्हे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, ललिता पाटील, डॉ. प्रमिलागीरी गोसावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील यांनी शिवसेनेचे सर्व आजी-माजी नगरसेवक, जि.प., पं.स. सदस्य, सरपंच, सदस्य, शिवसैनिक, सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि मतदार बंधु-भगिनींनी या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.








