जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय ‘ॲग्रोवर्ल्ड २०२५’ या भव्य कृषी प्रदर्शनाच्या अंतर्गत आज, रविवारी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शेतकरी पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात कृषी क्षेत्रात मेहनत घेऊन आपले नाव उंच करणाऱ्या शेतकरी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या गौरव सोहळ्याला श्रीराम प्लास्टिक अँड इरिगेशनचे संस्थापक श्रीराम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, लक्ष्मी ऍग्रो केमिकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी, भरत अमळकर, डॉ. केतकी पाटील, माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, डीआरडीओचे हरिष भोई, आणि ॲग्रोवर्ल्ड चे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी महिला शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे मत व्यक्त केले.

संघर्ष आणि यशाचे मनोगत..
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सन्मानार्थी महिला शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेतीत येताना करावा लागलेला संघर्ष, कुटुंबाची खंबीर साथ आणि अथक प्रयत्नांनी मिळत असलेले यश याबद्दल त्यांनी प्रांजळ मत मांडले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित कृषी प्रेमींना नवी ऊर्जा मिळाली. पुरस्काराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील महिलांच्या भरीव कार्याची दखल घेण्यात आली असून, हा सोहळा सन्मानार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कृषी प्रेमींच्या उपस्थितीत उत्स्फूर्त वातावरणात पार पडला.









