धुळे, (विशेष प्रतिनिधी) : शहरातील एका मुख्याध्यापकाने अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले. याप्रकरणी देवपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, विवेकानंदनगर, धुळे) असून मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याने पीडित महिलेला सुरुवातीला आर्थिक मदत केली होती, ज्याचा गैरफायदा त्याने घेत, १७ ऑगस्ट २०२३ रोजी, बोरसे याने महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिला शुद्धीवर नसताना तिच्यावर अत्याचार केला आणि या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रण केले.
अत्याचारानंतर, मुख्याध्यापक बोरसे याने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमक्यांच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये इतकी मोठी रक्कम उकळली. केवळ आर्थिक लुबाडणूकच नव्हे, तर व्हिडिओच्या आधारावर ब्लॅकमेल करत बोरसे याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचारही केला.
या पैशांव्यतिरिक्त, संशयित आरोपीने पीडित महिलेच्या सही केलेले पाच ते सहा धनादेश देखील स्वतःकडे ठेवून घेतले होते. पीडित महिलेने अखेरीस पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन पश्चिम देवपूर पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे धुळे शहरात खळबळ उडाली असून, एका प्रतिष्ठित पदावरील व्यक्तीचे हे कृत्य अत्यंत संतापजनक ठरले आहे.







