जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटना लक्षात घेऊन, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पारोळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून एका आरोपीतास जेरबंद केले आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु बिऱ्हाडे, दिपक माळी, रविंद्र पाटील, रावसाहेब पाटील, आणि चालक दिपक चौधरी यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, लामकाणी (ता-जि-धुळे) येथील मनोज पाडुरंग गायकवाड हा चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर, पथक अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते.

पथकाने लामकाणी येथे सापळा रचून आरोपी मनोज गायकवाड याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली असून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मोटारसायकलींबाबत पारोळा पोलीस स्टेशन आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.







