धरणगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ रस्त्यावर लुटमार करून पळून गेलेल्या चार आरोपींना धरणगाव पोलिसांनी घटनेच्या अवघ्या चार तासांत अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दि.१२ नोव्हेंबर च्या रात्री उशिरा, पद्मावती कनस्ट्रक्शन, खामगाव येथील सुपरवायझर धनंजय शंकर पाटील (रा. खोडांमळी, जि. नंदुरबार) हे त्यांचे कर्मचारी आणि ठेकेदार शंकर बामनी यांच्यासह त्यांच्या गाडीने जात होते. मुसळी फाट्यावरील ‘अर्जुना हॉटेल’ येथे जेवण करून ते पुढे निघाले असता, रात्री ११.१५ च्या सुमारास मुसळी गावाजवळ त्यांच्या गाडीला पांढऱ्या रंगाच्या ‘हुंडाई’ कारमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी रस्त्यात आडवी लावली.
या आरोपींनी फिर्यादी, ठेकेदार आणि कामगारांना गाडीतून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ठेकेदार शंकर बामनी यांच्या खिशातून ३०,०००/- रोख रक्कम जबरदस्तीने काढून पळ काढला. या घटनेनंतर तक्रारदार यांनी तत्काळ धरणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यानुसार धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची चक्रे वेगाने फिरली..
गुन्हा दाखल झाल्यानंतर, रात्रगस्तवर असलेले पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह (सपोनि प्रशांत कंडारे, पो.उप.नि. संतोष पवार, पो.हे.कॉ. महेंद्र बागुल, समाधान भागवत, सुधीर चौधरी, पो.कॉ. संदीप पाटील, किशोर भोई) तत्काळ कारवाईला सुरुवात केली. तक्रारदार यांनी दिलेल्या वर्णन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अवघ्या काही वेळातच पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सुनिल अशोक कुऱ्हाडे आणि विजय मेवालाल मोहीते या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्यासोबत गणेश लक्ष्मण अहीरे आणि कृष्णा अशोक राठोड हे देखील असल्याचे सांगितले.
गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि रक्कम जप्त..
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची कार आणि उर्वरित दोन आरोपींनाही ताब्यात घेतले. आरोपींनी जबरीने काढून घेतलेली रोख रक्कम ₹२९,७००/- त्यांच्या गाडीतून जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी सुनिल अशोक कुऱ्हाडे (वय २१), गणेश लक्ष्मण अहीरे (वय २१), कृष्णा अशोक राठोड (वय २१), विजय मेवालाल मोहीते (वय २५, सर्व रा. मुसळी, ता. धरणगाव) या सर्व आरोपींना दि. १३/११/२०२५ रोजी पहाटे अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहेत.








