पाचोरा, (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने आणि काही शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित न झाल्याने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात तीव्र आक्रोश व्यक्त केला.

चाळीसगाव तालुक्यात बागायतदार शेतकऱ्यांना बागायतीचे अनुदान मिळाले असताना, पाचोरा व भडगाव तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना ‘जिरायत’ दाखवून अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर विहीर आहे, त्यांना तात्काळ बागायतीचे अनुदान मिळावे. नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. डोंगरगाव येथील प्रत्येक कुटुंबाला आमदारांनी जाहीर केलेली एक लाखाची मदत तात्काळ द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान तहसीलदार विजय बनसोडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही तहसीलदार यांनी दिली. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिला. यावेळी ईश्वर पाटील, संतोष पाटील, प्रताप पाटील, राहुल शिंदे, चेतन बोदवडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.








