जळगाव, ( जिमाका वृत्तसेवा) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे (APEMVDC) कामकाज बंद झाले असल्याच्या आणि व्याज परतावा थांबवला असल्याच्या अफवा निराधार असून, महामंडळाचे सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. केवळ नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या थांबले आहे, असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.
महामंडळाने सी.एस.सी केंद्रांद्वारे फक्त ७० रुपयांत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एम.ओ.यू केला आहे. त्याच अनुषंगाने वेबप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे. यासाठी वेबप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. राज्यात विविध विकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने, सद्यस्थितीत नाशिक व अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे.
महत्वाचे आवाहन..
महामंडळ समाजाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असून, कोणताही राजकीय, दिशाभूल करणारा संदेश किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.








