जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका आंतर-जिल्हा टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपिंप्री येथील दोन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १५,६३,०००/- किमतीच्या तब्बल २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यात अटक केलेले आरोपींची नावे हिमंत रॅहज्या पावरा आणि अंबालाल भुरट्या खरडे (दोन्ही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) असे आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत, आरोपींना धडगांव (जि. नंदुरबार) येथील डोंगराळ व जंगल परीसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान, आरोपींनी अमळनेर आणि इतर पोलीस स्टेशन हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, सातपिंप्री (जि. नंदुरबार) येथील जंगल परीसरात लपवलेल्या २४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत १५ लाख ६३ हजार रुपये आहे. जप्त केलेल्या मोटारसायकलींमध्ये अशा विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. सदर आरोपींना अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ काशिनाथ पाटील व पोकॉ सागर साळुंखे हे करीत आहेत.








