जळगाव, (प्रतिनिधी) : ‘हरिनामातच परमेश्वराचा निवास असतो’ या मंगलमय भावनेने मेहरुण गावातील श्री संत ज्ञानेश्वर चौक येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे. वारकरी सांप्रदायातील हा महत्त्वाचा सोहळा ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने, तसेच ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्या आश्रयाखाली संपन्न होत आहे.
या सप्ताहाची सुरुवात दि. १० नोव्हेंबर रोजी झाली असून, समारोप दि. १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोहळ्याचा शुभारंभ माजी महापौर नितीन लढ्ढा व अलका लढ्ढा यांच्या हस्ते कलशारोहण करून करण्यात आला. या निमित्ताने दररोज पहाटे ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ तसेच रात्री कीर्तन व हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मेहरूण गावातील वातावरण सध्या मंगलमय झाले आहे.
या सप्ताहाचे आयोजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक व अर्चना नाईक यांच्या नेतृत्वाखाली होत असून, संपूर्ण मेहरूण ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होत आहेत. सप्ताहाचा समारोप काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करून केला जाणार आहे. नाईक परिवारातर्फे सर्व नागरिकांनी या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










