भडगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातून १९ रोजी रात्रीच्या सुमारास तीन अल्पवयीन मुली एकाच वेळी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मुलींना कोणीतरी फसवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत भडगाव पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्यांमध्ये दोन सावत्र बहिणी आणि त्यांच्या गल्लीत राहणारी तिसरी एक मुलगी यांचा समावेश आहे. १९ तारखेच्या रात्री या दोन सावत्र बहिणी घरात टीव्ही पाहत होत्या. रात्रीच्या वेळी मुलींच्या घरी त्यांचा एक नातेवाईक आला आणि त्याने मुली कुठे आहेत, अशी विचारणा आईकडे केली. आईने घरात पाहिले असता दोन्ही मुली जागेवर नव्हत्या. यानंतर गल्लीत चौकशी केली असता, त्यांच्यासोबतची तिसरी मुलगीही घरात नव्हती. या तीनही मुली कुठेही आढळून आल्या नाहीत.
पोलिसांत गुन्हा दाखल, विशेष तपास पथक कार्यरत..
दोन्ही मुलींच्या आईंनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० तारखेला भडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.
बेपत्ता मुलींच्या मोबाइल नंबरचे लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत, जेणेकरून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील. लवकरात लवकर मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.










