जळगाव, (प्रतिनिधी) : दिवाळीच्या धामधुमीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होण्याची परंपरा यंदा खंडित झाली असून, गेल्या आठ दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सुवर्णनगरीतील बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळत आहे.
आठ दिवसांतील घसरण:
गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल १४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यासोबतच चांदीच्या दरातही याच कालावधीत ३३ हजार रुपयांची विक्रमी कपात झाली आहे. मात्र आज दिनांक २८ रोजी २४ तासांत सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.
ग्राहक समाधानी, पण अपेक्षा कायम..
सोने व चांदीचे भाव इतके मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोने-चांदी खरेदी करण्यासाठी नागरिक पुन्हा गर्दी करत आहेत. याविषयी बोलताना एका ग्राहकाने सांगितले की, “सोन्याचे व चांदीचे भाव घसरल्यामुळे आम्ही त्याचे स्वागतच करतो. आम्हाला आता खरेदीची चांगली संधी मिळाली आहे, मात्र या दरात अजून घसरण व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”
सोने व्यापाऱ्यांनी वर्तवली २०२६ साठी मोठी शक्यता..
दुसरीकडे, सोने व्यापारी मात्र भविष्यातील दरवाढीबद्दल आश्वस्त आहेत. त्यांच्या मते, सध्याच्या घसरणीनंतर २०२६ पर्यंत सोन्याचे दर १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.










