जळगाव, (प्रतिनिधी) : मैत्रीचा खरा अर्थ फक्त सोबत असण्यात नाही, तर आठवणींतून समाजोपयोगी कार्य करण्यातही असतो. या भावनिक नात्याची आणि सामाजिक बांधिलकीची अनोखी गोष्ट धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात जीपीएस (GPS) ग्रुप मित्र परिवाराने प्रत्यक्षात आणली आहे. आपल्या सक्रिय सदस्य स्वर्गीय अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या गृपने पाळधीतील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरण आणि आधुनिकीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजलीतून समाजसेवा..
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचे निधन झाले होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये झालेल्या या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली होती. त्यांच्या निधनामुळे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही त्या दिवशीचे संपूर्ण प्रचारकार्य थांबवले होते, यावरून त्यांचे सामाजिक स्थान स्पष्ट होते. आज त्या घटनेला वर्ष पूर्ण झाले असताना, जीपीएस गृपने पारंपरिक कार्यक्रम, सत्कार सोहळे किंवा नुसते स्मरण न करता, स्वर्गीय मित्राच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची भूमिका घेतली.
यातूनच पाळधीतील स्मशानभूमी दत्तक घेण्याचा आणि तिचा कायापालट करण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जीपीएस गृपच्या या उपक्रमांतर्गत स्मशानभूमीच्या ठिकाणी स्वच्छता आणि रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची सोय, उत्कृष्ट प्रकाश व्यवस्था, बसण्याची सुयोग्य व्यवस्था आदि सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
जीपीएस गृपचे प्रताप गुलाबराव पाटील यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, “स्व.अनिल महाजन यांनी आयुष्यभर माणसात आपलेपणा जपला. त्यांच्या स्मृतीतून आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं घडवायचं ठरवलं. स्मशानभूमीचं सुशोभीकरण म्हणजे गावाच्या संवेदनशीलतेचा तो भाग आहे.”
जीपीएस मित्र परिवाराने उचललेले हे पाऊल केवळ एका मित्राच्या आठवणींना दिलेला भावनिक सन्मान नाही, तर मैत्रीच्या नात्यातून समाजसेवेचा अर्थ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे पाळधी गावात आता स्मशानभूमी स्वच्छ, आकर्षक आणि सुविधायुक्त होणार असून, अशा भावनिक आणि संवेदनशील कार्यातून गावात एक नवी आणि प्रेरणादायी परंपरा रुढ होत आहे.










