जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू देवयानी भिला पाटील हिने रत्नागिरी येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे.
दि.२३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देवयानीने मुलींच्या ४४ किलो आतील वजन गटात हे यश संपादन केले. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या शालेय राज्य स्पर्धेतही तिने कांस्यपदक जिंकले होते, ज्यामुळे तिची सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित होते. देवयानीला प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे.
देवयानीच्या या लक्षणीय यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे पदाधिकारी आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सदस्यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे, जैन स्पोर्टस् अकॅडमी अरविंद देशपांडे या सर्वांनी देवयानीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून, तिच्या या यशाने जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.










