जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे (वय २५, कांचन नगर) आणि त्याचे दोन साथीदार खुशाल पितांबर सोनार (वय २१) व चेतन पितांबर सोनार (वय २३) यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
तेजस सोनवणे हद्दपारीचा आदेश मोडत घातक हत्यारांसह नेहरू नगर परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून या तिघांना अटक केली. त्यांच्या कडून एक गावठी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस, एक धारदार लोखंडी कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर आर्म्स अॅक्ट आणि हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ०३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, सफौ विजसिंग पाटील, गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गणेश ठाकरे, किरण पाटील, नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे आदींच्या पथकाने केली.









