जळगाव, (प्रतिनिधी) : शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने शहरात विनापरवाना बेकायदेशीरपणे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाच्या मुसक्या आवळल्या आहे. जळगाव शहर पोलिसांनी हर्षल जितेंद्र कदम (वय-२८, रा. एस.के.ऑईल मिल जवळ मकरा टॉवर, जळगाव) नावाच्या एका व्यक्तीला बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बिग बाजार सर्कलजवळ दोस्ती बियर शॉपसमोर गुन्हे शोध पथकाने शिताफीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये आरोपीकडे १५,०००/- रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) आणि ५००/- रुपये किमतीचे १ जिवंत काडतूस, असा एकूण १५,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि दिपक सुरवळकर अधिक तपास करत आहेत. जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या या कामगिरीमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.








