जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ‘सर्वसामान्यांची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारे’ अधिकारी आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. आयुष प्रसाद यांच्या निरोप समारंभ आणि नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.
गुलाबराव पाटील यांनी आयुष प्रसाद यांच्या कामाची शैली उत्तम असून ते कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सांगितले. महसूल विभागासोबतच पोलीस, जिल्हा परिषद, मनपा यांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या पदाचा गर्व न बाळगता, जमिनीवर राहून काम केले आणि गोरगरिबांची कामे प्रामाणिकपणे केली. पाटील यांनी ‘आयुष प्रसाद एक दिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होतील,’ असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आयुष प्रसाद यांनी जळगावमधील कामाचा अनुभव चांगला असल्याचे सांगून, हे यश सर्वांचे असल्याचे नमूद केले. त्यांनी प्रशासकीय काम करताना ‘अहंकार सोडून कर्तव्यभावनेने काम करा,’ असा संदेश दिला. तसेच, नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या कार्यकाळात अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.