जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे मोठे महत्व आहे, कारण त्या शारीरिक विकास घडवून आणतात. मात्र, खेळ खेळताना केवळ टीमवर्क, उत्साह आणि नियोजनावरच नव्हे, तर कमालीच्या संयमावर अधिक भर देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केले.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. बुधवारी, दि. ८ रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
२४ संघांचा सहभाग; पहिल्याच दिवशी व्हॉलीबॉल, रस्सीखेचची रंगत
यावेळी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, प्राचार्या कविता देशमुख, प्राचार्या डॉ. नीलिमा वारके आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महर्षी धोंडो कर्वे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. नीलिमा वारके यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला. विष्णू भंगाळे यांनी खिलाडूवृत्तीचे महत्त्व सांगितले, तर डॉ. कविता खोलगडे यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. यानंतर हवेत फुगे सोडून आणि फीत कापून स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महर्षी कर्वे यांनी एसएनडीटी विद्यापीठ स्थापून स्त्री शिक्षण क्रांतीला नवीन आयाम दिला, याची आठवण करून दिली. तसेच तरुणांना क्रीडाविषयक अधिक संधी देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेत राज्यभरातून नागपूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबईसह विविध ठिकाणांहून एकूण २४ संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी व्हॉलीबॉल, तायक्वांदो आणि रस्सीखेच या खेळांचे सामने अतिशय अटीतटीच्या वातावरणात पार पडले, ज्यात प्रत्येक महिला खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसली.