पाचोरा, (प्रतिनिधी) : गेल्या महिन्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले होते. अक्षरशः जमिनी खरडून गेल्या, जनावरे दगावली आणि घरे जमिनदोस्त झाली. या विदारक परिस्थितीत रब्बी हंगामाची पेरणी कशी करावी, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक नुकसानग्रस्त भागाची स्वतः पाहणी केली आणि तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्री दत्तामामा भरणे, गिरीश महाजन आणि मदन पाटील यांची भेट घेतली. दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना या संकटातून उभे करण्यासाठी त्यांनी सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली होती.
मागणीला अखेर यश..
आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्यातील ज्या २४७ तालुक्यांमध्ये सरसकट मदत देण्याचे राज्य शासनाने घोषित केले आहे, त्या यादीत पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना भरपाईचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले, “अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला, ती परिस्थिती पाहून माझ्याही डोळ्यांत पाणी आले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह कृषीमंत्र्यांसमोर मांडली. त्यांनी दोन्ही तालुक्यांचा समावेश सरसकट भरपाईच्या यादीत करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.” या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.