जळगाव, (प्रतिनिधी) : सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेचे उद्घाटन जळगाव येथील अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक असून, यात दुबई आंतरराष्ट्रीय संघासहित एकूण १३ संघांतील २६० खेळाडू सहभागी झाले आहेत.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी खेळाडूंना सल्ला दिला की, जीवनात मोठे कार्य करण्यासाठी संघ सोबत लागतो आणि खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही सांघिकता जीवनातही अंगीकारावी आणि शिक्षणासोबतच खेळातून देशहित जोपासावे. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन व आपले आजोबा मित्र होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. जीवनात आलेल्या अडचणींवर खेळभावनेतून मात करता येते, ही सकारात्मक भावना ठेवून प्रत्येक संघाने आपले सर्वोत्तम योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा व पदाधिकारी, निवड कमिटीचे सदस्य संजय पवार, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी होते. अशोक जैन व अतुल जैन यांनी रोहित पवार यांचा सत्कार केला.
महाराष्ट्राची विजयी सलामी..
उद्घाटन झाल्यावर लगेच सुरू झालेल्या साखळी सामन्यांपैकी ‘ए’ गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तराखंड संघावर ५८ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राने १५ षटकांत १४५ धावा केल्या होत्या. उत्तराखंडचा संघ ८७ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्राच्या आदी लुंगानी याने ११ चेंडूत २५ धावांची धडाकेबाज खेळी करत आणि केवळ ७ धावा देत एक बळी घेतल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
स्पर्धेतील सर्व सामने अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस आणि एमके स्पोर्टसच्या मैदानांवर रंगणार आहेत. ‘ए, बी, सी, डी’ अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे आणि प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.