जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जळगाव येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी, वर्ग-०२, राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले आहे. तक्रारदाराचा अर्ज ‘रिजेक्ट’ करण्यासाठी त्यांनी १५,०००/- रुपयांची लाच मागितली होती आणि ही लाचेची रक्कम मनोज बापु गाजरे (खाजगी इसम) याने स्वीकारली. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
रावेर येथील एका हॉस्पिटलच्या मॅनेजरने (तक्रारदार) हॉस्पिटलच्या बायोवेस्ट संबंधीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १६/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव येथे अर्ज केला होता. मात्र, आरोपी अधिकारी सुर्यवंशी यांनी अर्जात त्रुटी काढल्या होत्या. त्यानंतर तक्रारदाराने नाशिक कार्यालयातून सदर प्रमाणपत्र मिळवले. यामुळे, जळगाव कार्यालयात केलेला जुना अर्ज काढून घेण्यासाठी तक्रारदार ११ सप्टेंबर रोजी कार्यालयात गेले. त्यावेळी सुर्यवंशी यांनी, तो अर्ज ‘रिजेक्ट’ करण्याच्या कामासाठी १५,०००/- रुपये लाचेची मागणी केली आणि ती रक्कम खाजगी इसम मनोज बापु गाजरे यांच्याकडे देण्यास सांगितले.
एसीबीने रचला सापळा..
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. २३/०९/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेच्या मागणीची पुष्टी झाली.
यानुसार, दिनांक २४/०९/२०२५ रोजी एसीबीने सापळा कारवाई केली. आरोपी अधिकारी राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी यांच्या मागणीनुसार, १५,०००/- रुपयांची लाच रक्कम खाजगी इसम मनोज बापु गाजरे यांनी स्वीकारली. या घटनेनंतर क्षेत्र अधिकारी राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी आणि खाजगी इसम मनोज बापु गाजरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सापळा कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक तसेच पो.ना. बाळू मराठे, पो.शी. भूषण पाटील त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.