जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि देशभक्तीची भावना रुजली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे एक सुसंस्कारीत पिढी घडवणेही महत्त्वाचे आहे. या विचारातून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व पी.ई. तात्या पाटील रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने शनिवार विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात एकूण ४५० विद्यार्थ्यांची आणि १०० पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले. या शिबिरात होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव, नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्राची खलसे, भावना दातीर, हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, फैज खान यांनी तपासणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.