जळगाव, (प्रतिनिधी) : परराज्यातील (गुजरात) एका सराईत आणि अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. साहील उर्फ सलीम पठाण (वय २१, रा. सुरत) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
१९ सप्टेंबर रोजी सुरत (गुजरात) येथील निझर पोलीस स्टेशनकडून जळगाव पोलिसांना माहिती मिळाली की, जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी साहील उर्फ सलीम पठाण हा जळगाव जिल्ह्यात आला आहे. ही माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी भुसावळ उपविभागातील पथकाला तात्काळ सूचना दिल्या.
पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भुसावळ शहरात नहाटा चौफुलीजवळील हायवेवर सापळा रचला. आरोपी साहील पठाण सापळ्यात अडकताच त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीवर गुजरातच्या उमरा, सचिन, माहीरापुरा, पुना, कडोदरा, नवसारी ग्रामीण अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी, आणि आर्म ॲक्ट अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी निझर पोलीस स्टेशन, सुरत येथील पोलीस कर्मचारी ए.बी. पटेल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोलीस हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस शिपाई प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने पार पाडली.