जळगाव, (प्रतिनिधी) : संत रूपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन लवकरच व्हावे आणि संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंजी. रमेशचंद्र घोलप बारी यांच्या नेतृत्वात केली आहे. या संदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.
अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमरावती यांना यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी महासंघासोबत बैठक घेतली आणि स्मारकासाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरी आणि आर्थिक तरतुदीसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे. याव्यतिरिक्त, बारी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या या महामंडळाच्या संचालक मंडळाची नियुक्ती प्रलंबित आहे, ज्यामुळे कामकाज थांबले आहे.
महासंघाने निवेदनात नमूद केले आहे की, दोन्ही मागण्या मान्य झाल्याने संपूर्ण बारी समाजात समाधानाचे वातावरण आहे आणि समाजाने जागोजागी मेळावे घेऊन सरकारचे आभार मानले आहेत. अखिल भारतीय बारी समाज महासंघाने सरकारला या संवेदनशील विषयावर तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
यावेळी अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे यशवंत बारी, अरुण बारी, भरत बारी, सागर बारी, भूषण बारी, राजेंद्र बारी, योगेश घोलप, सुहास लावणे, मयूर बारी, अतुल बारी, बंटी बारी, गजानन बारी आदींसह बारी समाज बांधव उपस्थित होते.