जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेने आता नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून व्हॉट्सअॅप चॅटबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना जिल्हा परिषदेशी संबंधित तक्रारी आणि विविध योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचा अधिकृत व्हॉट्सअॅप क्र. ९४२१६१०६४५ असून, या क्रमांकावर मेसेज पाठवून नागरिक थेट तक्रार दाखल करू शकतील. त्याचबरोबर, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या सेवा आणि योजनांची माहिती देखील या चॅटबोटद्वारे सहज उपलब्ध होईल.
हा उपक्रम डिजिटल गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक बनवण्यास मदत करेल. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासकीय सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मीनल करनवाल यांनी सांगितले. या सेवेमुळे नागरिकांना आता प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील.