पाचोरा, (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सव आणि ईद-दुर्गोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्याच्या शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात पार पडलेल्या या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी मंडळांना मूर्तींची उंची वाढवण्याऐवजी विचारांची उंची वाढवण्याचे आवाहन केले. सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवण्यासाठी हे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार किशोर पाटील यांनी भूषवले. यावेळी प्रभारी डीवायएसपी अरुण आव्हाड, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, विद्युत मंडळाचे भरत उकलकर, एपीआय वर्मा यांच्यासह शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य आणि विविध मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांचा सहभाग महत्त्वाचा: अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर
बैठकीच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी प्रास्ताविक सादर केले. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी मार्गदर्शन करताना उत्सवाच्या नियोजनात महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला. प्रत्येक गणेश मंडळाने नियोजन समितीत महिलांना स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, मंडळांना परवानगीसाठी त्रास होऊ नये यासाठी ‘एक खिडकी अभियान’ राबवण्याचे आदेश त्यांनी महसूल आणि नगरपालिका प्रशासनाला दिले.
विचारांची उंची वाढवण्याचे आवाहन..
आमदार किशोर पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “मूर्तींची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवा” हा संदेश दिला. त्यांनी गणेशोत्सवाला केवळ धार्मिक कार्यक्रम न मानता, सामाजिक संस्कारांचे विद्यालय मानले. उत्सवकाळात वीजपुरवठा अखंडित ठेवण्याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीला विशेष सूचना दिल्या. सर्व शासकीय कार्यालयांनी मंडळांना त्वरित मदत मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली.
या बैठकीत सर्वानुमते काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात प्रत्येक मंडळाने महिलांचा सहभाग सुनिश्चित करणे, एक खिडकी अभियानातून परवानगी मिळवणे, वर्गणीची सक्ती न करणे, अमली पदार्थमुक्त उत्सव साजरा करणे आणि सुरक्षा तसेच स्वयंसेवकांचे पथक तयार ठेवण्यावर एकमत झाले. पाचोरा तालुक्याचा गणेशोत्सव व ईद-दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकी, धार्मिक ऐक्य आणि सुरक्षिततेचा आदर्श ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.