जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत एका मोटार सायकल चोराला अटक करण्यात यश आले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेली ऍक्टिव्हा मोटार सायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास फिर्यादी त्यांची ऍक्टिव्हा (क्रमांक एमएच-१९, बीआर-८५३८) एचडीएफसी बँकेसमोर, पांडे चौक येथे लावून सरकारी दवाखान्यात गेले होते. याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने ती मोटार सायकल चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोटार सायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक डाॅ. माहेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. यावर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, चोरीला गेलेली ऍक्टिव्हा मोटार सायकल रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे आहे आणि अनुराग जाधव नावाचा व्यक्ती ती वापरत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, अनुराग जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यानेच ती मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या काळात पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली ऍक्टिव्हा मोटार सायकल हस्तगत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोटार सायकल चोरांना चांगलाच पायबंद बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.