जळगाव, (प्रतिनिधी) : शून्य विद्युत अपघाताचे उद्दिष्ट ठेवून जनजागृती करण्यासाठी महावितरणने आयोजित केलेल्या ‘विद्युत सुरक्षा अभियान’ या उपक्रमाला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. या अभियानात विविध उपक्रमांद्वारे लोकसहभाग मिळवल्याबद्दल महावितरणला दोन्ही संस्थांकडून गौरवण्यात आले.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून हे अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्व अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
विक्रमांची माहिती:
▪️सहभागाचा विक्रम: महावितरणच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त १ ते ६ जून या कालावधीत राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २ लाख ११ हजारहून अधिक नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
▪️सर्वाधिक एसएमएस आणि ईमेल: १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना एसएमएसद्वारे आणि ३५ लाख ७३ हजार ग्राहकांना ईमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश पाठवण्यात आला.
▪️सर्वाधिक शपथ घेणारे: ६ जून रोजी एकाच वेळी ४२ हजार २०१ लोकांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली.
▪️सर्वाधिक लोकसहभाग रॅली: विद्युत सुरक्षेच्या रॅलीमध्ये २७ हजार १५५ जणांनी भाग घेतला.
▪️ऑनलाइन प्रश्नमंजुषा: ९६ हजार १५० जणांनी ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला.
या सर्व विक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार परीक्षण झाल्यावर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही या विक्रमांना स्थान मिळाले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा मयंक शाह यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन महावितरणला गौरवण्यात आले. यावेळी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, प्रसाद रेशमे (प्रकल्प) आणि स्वाती व्यवहारे (वित्त) उपस्थित होते. या यशाबद्दल बोलताना संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले की, “लोकसहभागामुळे हे अभियान यशस्वी झाले आहे. यापुढेही या अभियानाची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल.”
कार्यक्रमात उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला मुख्य अभियंते सर्वश्री मनीष वाठ, दत्तात्रेय बनसोडे, प्रशांत दानोळीकर, हरिश गजबे, वादिराज जहागिरदार, दीपक कुमठेकर, मिलिंद दिग्रसकर, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदी उपस्थित होते.