जळगाव, (प्रतिनिधी) : माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत महत्त्वाचे विषय सुरू असताना मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळल्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जळगावात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी, भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, शेतकऱ्यांचा बंद झालेला पीक विमा पुन्हा सुरू करावा, अशा अनेक मागण्या ‘उबाठा’ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी आणि उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पत्त्यांचा डाव मांडून अनोखे आंदोलन केले.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. यावेळी माजी खासदार उन्मेश दादा पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.